बातमीचा प्रवास : घटनास्थळ ते टीव्हीचा पडदा

श्रीरंग गायकवाड, वृत्त संपादक, पुढारी, पुणे.

 

वर्तमानपत्राप्रमाणेच वृत्तवाहिनी अर्थात टीव्ही न्यूज चॅनेलचे रोजचे काम चालते. अर्थात या कामात मोठा फरक असतो तो वेगाचा आणि दृश्यांचा. (Visuals) म्हणजेच घटना ज्या क्षणी घडली त्याच क्षणी किंवा लवकरात लवकर ती टीव्हीच्या पडद्यावर झळकावी याला चॅनेल्समध्ये प्राधान्य दिले जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्या घटनेची दृश्य पडद्यावर दिसावीत यासाठी मोठे प्रयत्न केले जातात. कारण टीव्ही हे दृश्य माध्यम आहे.

 

 

‘टीव्हीवर पाहिले’ आणि ‘पेपरात वाचले’ असे म्हणतात ते यामुळेच. वृत्तपत्रांची एक ‘डेडलाईन’ (बातमी छपाईला देण्याची शेवटची वेळ) ठरलेली असते. म्हणजे आपल्याकडे रात्री उशीरा 11 ते 1 वाजेपर्यंत वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात बातमीदार बातम्या देतात. त्यानंतर छपाई सुरू होते आणि पहाटेच ताज्या बातम्यांसह पेपर घराघरांत जाऊन पडतो. टीव्हीचे मात्र तसे नसते. ज्या क्षणी घटना घडली, त्यानंतर काही क्षणांतच ती पडद्यावर दाखवली जाते. त्यामुळे टीव्ही रिपोर्टरचे काम हे वर्तमानपत्राच्या रिपोर्टरपेक्षा अधिक धावपळीचे असते. त्यांना विशिष्ट अशी ‘डेडलाईन’ नसते.

 

न्यूज चॅनेल्सकडे बातम्या येतात कुठून?

वृत्तपत्राप्रमाणेच टीव्ही न्यूज चॅनेल्स गावोगावी, तालुका, जिल्हा, परराज्य, परदेशात आपले बातमीदार नियुक्त करतात. टीव्हीच्या बातम्यांचा वेग लक्षात घेऊन वृत्तसंकलनासाठी त्यांच्याकडे आधुनिक साधने दिलेली असतात. त्यांच्या सहाय्याने ते बातम्या पाठवतात. तसेच चॅनेल्सचे मुख्य ऑफिसात स्वत:च्या बातमीदारांचा ताफा असतो. याशिवाय टीव्ही चॅनेल्सना बातम्या पुरवणाऱ्या काही व्यावसायिक संस्था असतात. त्याही देशपरदेशातील बातम्या दृश्यांसह न्यूज चॅनेल्सच्या ऑफिसमध्ये पाठवत असतात. काही चॅनेल्स परदेशातील चॅनेल्सशी सहकार्य करार करतात. त्यामुळे त्यांना त्या देशातील तसेच इतर देशांतील बातम्या मिळतात. उदा. ‘सीएनएन-आयबीएन’ हे नॅशनल चॅनल. आयबीएन या भारतीय चॅनेलने अमेरिकेच्या सीएनएन या चॅनेलशी करार केलेला आहे. त्यामुळे सीएनएन चॅनेलवरील अमेरिका तसेच जगभरातील बातम्या त्यांना मिळतात. त्या ते भारतीय प्रेक्षकांना दाखवतात. याशिवाय ‘सीटिझन जर्नलिस्ट’ ही संकल्पना आता अधिकाधिक रुजू लागली आहे. यामध्ये नागरिक त्यांना उत्स्फुर्तपणे चॅनेल्सला बातम्या पाठवतात.

 

बातम्या पाठवण्याची साधने कोणती आहेत?

वृत्तपत्रांच्या कार्यालत लँडलाईन टेलिफोन, मोबाईल, फॅक्स आदी संपर्क साधनांच्या सहाय्याने बातम्या पाठवल्या जातात. टीव्ही चॅनेल्सचे रिपोर्टरही या साधनांचा आधार घेतात. अर्थात बातमी लवकरात लवकर द्यायची असल्याने ते सध्या मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना दिसतात.

 

वर्तमानपत्राचे बातमीदार पूर्वी कागदावर बातमी लिहून फॅक्स करत. आता बातमी संगणकावर टाईप करून पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. चॅनेल्सचे रिपोर्टर मात्र बातमी मोबाईलवरूनच किंवा संगणकावर टाईप करून मेल करतात.

 

चॅनेल्सच्या रिपोर्टर्सना केवळ मजकूर पाठवून भागत नाही तर त्यांना त्या घटनेचे फुटेज अर्थात दृश्ये पाठवावी लागतात. त्यासाठी त्यांना व्हिडिओ कॅमेरा दिलेला असतो. त्याच्या सहाय्याने टिपलेली दृश्ये ते ‘इंटरनेट’, ‘लीजलाईन’, ‘ओबी व्हॅन’, ‘बॅकपॅक’ आदींच्या माध्यमातून पाठवतात. यापैकी लीजलाईन ही ब्यूरो ऑफिस म्हणजे चार-पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या ऑफिसात बसवलेली असते. तर ओबी अर्थात आऊटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन म्हणजे चालते बोलते थेट प्रक्षेपणच असते. या डोक्यावर गोल अँटेना लावलेल्या व्हॅनच्या सहाय्याने घटनास्थळावरून घटनेचे थेट प्रक्षेपण केले जाते. चॅनेलच्या स्टुडिओमधून ज्याप्रमाणे प्रक्षेपण होते, त्याचप्रमाणे उपग्रहाच्या सहाय्याने ओबी व्हॅनच्या द्वारे आपल्याला टीव्हीवर थेट दृश्ये दिसू लागतात. ओबी व्हॅनचाच लहान अवतार म्हणजे बॅकपॅक. नेहमीच्या सॅकप्रमाणे एक मनुष्य पाठीवरून वाहून नेऊ शकेल अशा या साधनाच्या सहाय्याने आता बहुतेक न्यूज चॅनेल्स थेट प्रक्षेपण करतात. भविष्यात हे तंत्र अधिकाधिक प्रगत होत जाणार आहे. इंटरनेट ‘फोर जी’ सुविधा आल्यानंतर तर अगदी हातातील मोबाईलवरूनही असे घटनेचे थेट प्रक्षेपण होऊ शकेल.

 

बातमी टीव्हीवर पहिल्यांदा कशी दिसते?

बऱ्याचदा बातमीदाराला घटना माहीत झालेली असते, परंतु दृश्ये (Visuals) मिळालेली नसतात. ती मिळेपर्यंत बातमीदार थांबत नाही. तर तो तातडीने मेसेज अथवा फोन करून आपल्या ऑफिसात ती बातमी कळवतो. मग पहिल्यांदा ही बातमी टीव्ही स्क्रीनच्या खालच्या पट्टीवर अक्षरांमध्रे झळकू लागते. त्याला ‘टिकर’ असे म्हणतात. बातमी मोठी, महत्त्वाची असेल तर त्या पट्टीवरच ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून ती झळकू लागते. बातमी जर अगदीच मोठी असेल तर चॅनेलवर सुरू असलेल्या नेहमीच्या बातम्या अथवा कार्यक्रम थांबवून ती बातमी दाखवण्यास सुरुवात करतात. दृश्ये पोहोचलेली नसतील तर मोठमोठ्या अक्षरांतील बातमीचे ग्राफिक्स टीव्ही स्क्रिनवर झळकू लागते. बातमीच्या महत्त्वानुसार त्याला ‘ताजी बातमी’, ‘मोठी बातमी’, ‘ब्रेकिंग न्यूज’ आदी संबोधले जाते. ती बातमी अथवा घटनेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी संबंधित बातमीदाराचा ‘फोनो’ घेतला जातो. म्हणजेच बातमीदार फोनवर घटनेविषयी सविस्तर माहिती सांगतो. बहुदा अपघात, दुर्घटना अशा प्रकारच्या बातम्या पहिल्यांदा अशाप्रकारे दाखवतात. दृश्ये मिळाल्यानंतर ग्राफिक्सऐवजी लगेचच स्क्रीनवर दृश्ये झळकू लागतात.

 

बातमी चॅनेलच्या ऑफिसात पोहचल्यावर काय प्रक्रिया होते?

आलेली बातमी टीव्हीच्या पडद्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने पुढील विभाग कार्यरत असतात – इनपुट / असाईनमेंट (Input / Assignment) – या विभागाकडे प्रामुख्याने बातमीदारांचे नियंत्रण असते. बातम्यांचे नवनवीन विषय शोधणे, बातमीदारांकडून ते करवून घेणे, त्यासाठी बातमीदाराकडे पाठपुरावा करणे, आलेल्या बातम्या चॅनेल हेड, व तसेच न्यूजरुममधील सहका-यांना कळवणे आदी कामे इनपुट किंवा असाईंनमेंट विभागाकडे असतात. न्यूजरुमला बातम्या मिळतात त्या इनपुट विभागाद्वारे. या विभागाकडून आलेले मेसेज, दृश्यांबाबत संबंधितांना कळवले जाते.

 

एमसीआर (Master Control Room)-

टीव्हीच्या ऑफिसात वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या बातम्यांचे फुटेज अर्थात दृश्ये येत असतात. उदा. एकाच वेळी एखाद्या ठिकाणाहून क्रिकेटमॅच, दुसऱ्या ठिकाणाहून एखादा जाहीर कार्यक्रम, तिसऱ्या ठिकाणाहून ग्रामीण भागातील दुष्काळ, चौथ्या ठिकाणाहून बॉलीवूडचा एखादा कार्यक्रम इ. दृश्ये येत असतात. त्यांचा योग्य समन्वय आणि वर्गवारी करून ती दृश्ये साठवून ठेवण्याचे काम हा विभाग करतो. त्यासाठी इनपुट विभागाशी समन्वय ठेवला जातो.

 

आउटपुट –

इनपुटसोबतच आउटपुट विभाग न्यूज चॅनेलमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण ‘ऑन एअर’ अर्थात टीव्ही स्क्रीनवर बातम्या दाखवण्याची अंतिम जबाबदारी या विभागाची असते. वर्तमानपत्रातील ‘डेस्क’ अर्थात संपादकीय विभागाप्रमाणे टीव्हीमध्ये आउटपुट काम करत असते. बातम्यांची निवड करणे, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे, बातम्यांमध्ये आवश्यक ते बदल करणे, एखादी घटना किती वेळ दाखवायची याचा निर्णय घेणे आदी महत्त्वाची कामे आउटपुट करतो.

 

प्रोडक्शन –

वरील सर्व विभागांप्रमाणे प्रोडक्शन विभाग महत्त्वाचा असतो. कारण तो प्रत्यक्ष बातम्या तयार करत असतो. टीव्हीवरील प्रत्येक बातमी म्हणजे एक छोटा सिनेमाच असतो. त्यामुळे दृश्ये व्यवस्थित आणि परिणामकारकरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावीत यासाठी हा विभाग दृश्यांचे संपादन करत असतो. या विभागात चॅनेलच्या गरजेनुसार अनेक प्रोड्युसर्स, व्हिडिओ एडिटर काम करत असतात. आलेली दृश्ये साफसूफ करून, व्यवस्थित करून प्रक्षेपणासाठी देणे हे या विभागाचे मुख्य काम असते.

 

पीसीआर (Production Control Room) –

या विभागाला स्टुडिओ कंट्रोल रुम असेही म्हणतात. बातम्यांवर सर्व विभागांचे संस्कार झाल्यानंतर त्या ‘ऑन एअर’ अर्थात टीव्हीवर दाखवण्याचे अंतिम तांत्रिक काम हा विभाग करतो. या विभागाचे संचलन स्टुडिओ डायरेक्टर करतो. तो स्टुडिओत बातम्या देत असलेल्या अँकरला सूचना देत असतो. तसेच एमसीआर, आउटपुट, प्रोडक्शन या विभागांशी संपर्कात असतो. या विभागात स्क्रीनवर विविध आकाराच्या विंडोज अर्थात खिडक्या बनवणारे, आवाज कंट्रोल करणारे, टिकरपट्टी फायर करणारे, अँकर ज्यावर बातम्या वाचतो तो टेलिप्रिंटर चालवणारे, आवाज कंट्रोल करणारे आदी कर्मचारी काम करत असतात. स्टुडिओतील इंजिनिअर्स, कॅमेरामन यांच्याशीही हा विभाग समन्वय ठेवून असतो.

 

(लेखक हे दै. पुढारी, पुणे येथे वृत्तसंपादक म्हणून कार्यरत असून मराठी वृत्तवाहिन्या आयबीएन-लोकमत व मी मराठी साठी अनुक्रमे असोसिएट एडिटर व न्यूज एडिटर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *