बातमीदारी: एक जबाबदारी

रणजित खंदारे

वृत्त संपादक सकाळ, औरंगाबाद

 

वर्तमानपत्र असो किंवा दूरचित्रवाणी, कोणत्याही प्रसारमाध्यमाचा मुख्य कणा असतो तो बातमीदार (वार्ताहर). समाजात मिळणाऱ्या मानसन्मानाबरोबरच बातमीदारीचा दुसरा अर्थ जबाबदारी आहे, याचे भान बातमीदारास असणे गरजेचे आहे. बातमीदाराने पाठविलेल्या बातमीतील माहिती अंतिम समजून ती प्रसिद्ध केली जाते.

 

त्यामुळे एखादी महत्वाची बातमी आपणास समजली की आपण प्रथम तिची खातरजमा केली पाहिजे.

खात्री झाल्याबरोबर आपल्या वर्तमानपत्राचे जिल्हा कार्यालय, आवृत्तीचे काम पाहणाऱ्या उपसंपादकांना ती कळवली पाहिजे. राज्यपातळीवरील महत्वाचा विषय असेल तर वृत्तसंपादक किंवा संपादकांशी त्याविषयी बोलले पाहिजे. त्यांच्याशी चर्चा करताना बातमीचे आणखी काही पैलू समोर येतात. त्यामुळे आपली बातमी परिपूर्ण होते. एखाद्यावेळी बातमी महत्वाची असते; मात्र खात्री होत नाही किंवा कोणी अधिकृतपणे बोलण्यास तयार नसते.

 

अशावेळीही आपण वरिष्ठांशी बोललो तर आणखी कोणाकडून खात्री करता येऊ शकते का किंवा अशा परिस्थितीत ती बातमी कशी लिहायची, याबाबत त्यांच्याकडून सूचना मिळू शकतात.

 

आपण संपर्काच्या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांशी आपला जेवढा संपर्क तेवढे आपले माहितीचे स्रोत (सोर्स) अधिक असतात. केवळ अधिका-यांशी किंवा पुढा-यांशी संपर्क ठेवला म्हणजे आपल्याला सर्व माहिती मिळू शकते, असे समजू नये. त्यांच्याएवढेच अगदी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांपर्यंतचे सर्व कर्मचारी, गावपातळीपर्यंतचे कार्यकर्तेही महत्वाचे असतात. याबरोबरच उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळी, संघटनांचे पदाधिकारी आदींशी आपण नेहमी त्यांच्या क्षेत्रातील विषयांवर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे त्या त्या क्षेत्रात काय चालले आहे, हे आपणास माहिती होईल व त्या क्षेत्रातील बातमी लिहिताना आपणास अडचण येणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरील बातमीदारास केव्हा, कोणत्या विषयावर बातमी लिहावी लागेल हे सांगता येत नाही. या संपर्काचा फायदा अशा वेळी होईल. डिझेल, पेट्रोलचे भाव कमी- जास्त झाल्यास त्याचा ग्रामीण अर्थकारणावर काय परिणाम होऊ शकतो किंवा कांदा, बटाट्याचे उत्पादन घटल्यानंतर सरकारला त्याला कसे तोंड द्यावे लागते हे आपणास माहीत असायला हवे.

 

पूर्वी माहिती मिळविण्राची साधने तुटपुंजी होती. त्यामुळे लोकांना वर्तमानपत्र किंवा आकाशवाणीवर अवलंबून राहावे लागत असे. 6. आता संपर्काची साधने एवढी वाढली आहेत की, एखादी घटना घडल्यानंतर ती काही सेकंदांत जगभर पसरू शकते. इंटरनेट, दूरचित्रवाणी, सोशल मीडियामुळे माहितीच्या बाबतीत तर जग आता एक खेडे झाले आहे, असे म्हटले जाते. एखादी बातमी दिवसभर टीव्हीवर दाखवल्यानंतर वाचकाने तीच माहिती वर्तमानपत्रातून का वाचावी, असा प्रश्न आपणास पडला पाहिजे. म्हणजे आपण त्या घटनेची अशी बाजू किंवा पैलू शोधला पाहिजे की ज्यामुळे वाचकाला दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळे वाचण्यास मिळेल.

 

बातमी लिहिताना घ्यावयाची काळजी

बातमी परिपूर्ण होण्यासाठी ज्या सहा प्रश्नांची उत्तरे बातमीत असली पाहिजेत ते प्रश्न असे

1) घटना कोठे घडली? 2) कशी घडली? 3) केव्हा घडली? 4) काय घडले? 5) का घडली? 6) कोणाकडून घडली? बातमी लिहिताना ती किती वाचकांच्या उपयुक्ततेची आहे? याचा विचार करावा व त्यानुसार तिची शब्दसंख्या आपणच निश्चित करावी.

उदा. गावात चार दिवस पाणी येणार नाही ही बातमी आणि एखाद्या व्यक्तीला पीएचडी मिळाली, ही बातमी समोर ठेवली तर यातील कोणती बातमी सर्वाधिक वाचकांच्या उपयोगी पडणारी आहे. हे आपण ठरवू शकतो. आपण अनेकवेळा कोणतीही बातमी दोनशे ते पाचशे शब्दांची लिहित असतो. मात्र दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झाल्यानंतर लक्षात येते की ती बातमीतील 50 ते %0 टक्के मजकूर कमी केलेला आहे. त्यामुळे आपण पाठवलेली बातमी आणि प्रसिद्ध झालेली बातमी समोर ठेऊन तुलना केली तर कोणते शब्द किंवा कोणता मजकूर कमी केला हे लक्षात येईल व पुन्हा त्याच स्वरूपाची बातमी लिहिताना अनावश्यक बाबी कमी करून बातमी लिहिता येईल. या पद्धतीने विचार करून बातमी पाठवली तर आपला भ्रमनिरास होणार नाही.

 

अपघाताची बातमी लिहिताना ऐकीव माहितीच्या आधारे लिहू नये. शक्यतो अपघातस्थळी स्वतः गेल्यास अनेक वेगळे मुद्दे येऊ शकतात. अपघात का झाला, तो टळला असता का? पोलिस कधी पोचले? प्रथम कोणी मदत केली? किंवा मदत वेळेवर न मिळाल्याने मृतांचा आकडा वाढला का? आदी माहिती घटनास्थळी गेल्यानंतरच मिळू शकते आणि तेच आपल्या बातमीतील वेगळेपण ठरू शकते. अपघातातील मृतांची संख्या लिहिताना पोलिस किंवा रुग्णालयाकडून मिळालेलाच आकडा लिहावा. ऐकीव माहितीवर संख्या देण्याचा मोह टाळावा.

 

गुन्हेगारीच्या बातमीत आरोपीला संशयित आरोपी असाच शब्द वापरावा; कारण जोपर्यंत त्याच्यावर न्यायालयात आरोप किंवा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो संशयितच असतो. न्यायालयाच्या निकालाची बातमी देताना बातमीदाराने उतावीळपणा टाळून काही भान ठेवणे आवश्यक आहे. 7. जोपर्यंत न्यायमूर्ती, न्यायाधीश यांनी दिलेल्या निकालाची प्रत हाती पडत नाही तोपर्यंत बातमी देण्याचा मोह टाळावा. चोरी, दरोडा हे शब्द केव्हा वापरावेत हे त्या प्रकरणात कोणते कलम लावले आहे त्यावर अवलंबून असते. त्यामुळे कोणते कलम केव्हा लावले जाते किंवा कोणते कलम लावले आहे त्यावरून तो कोणता गुन्हा आहे हे पोलिस अधिका-यांकडून किंवा वकिलांकडून समजावून घेतले पाहिजे.

 

(उदा. पाचपेक्षा अधिक जणांनी मारहाण करून लुटले असेल तर तो दरोडा ठरतो.) गुन्हेगाराने वापरलेल्या वाहनाच्या मालकाचे नाव खात्री करूनच लिहावे. चोरट्यांनी व्यापाराची गाडी वापरली अशी चर्चा असते. प्रत्यक्षात मात्र ती गाडी त्याच्या घरातील दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर नोंदवलेली असते. पोलिसांकडून मालकाची खात्री करून योग्य संदर्भांसह गाडीमालकाचा उल्लेख करावा.

 

गुन्हेगार जर अल्पवयीनन असेल तर त्याचे नाव बातमीत घेऊ नये. बलात्कार, विनयभंगाच्या बातमीमध्ये संबंधित महिलेचे, मुलीचे नाव प्रसिद्ध करू नये.

 

आरोप – प्रत्यारोपांच्या बातम्यांमध्ये कोणी कोणाची बदनामी करण्याच्या उद्देशाने तर आरोप करत नाही ना? याची खात्री करावी. त्याबरोबर ज्याच्यावर आरोप आहेत त्याचे म्हणणे शक्यतो त्याच दिवशी त्या बातमीसोबत द्यावे. भ्रष्टाचाराच्या आरोपात तर आपल्याकडे सबळ पुरावे असतील तरच थेट त्या व्यक्तीचे नाव घ्यावे. पुरावे नसतील मात्र खात्री असेल तर कोणाचेही नाव न घेता बातमी लिहावी व संबंधित खात्रीच्या वरिष्ठ अधिका-याचे किंवा संस्थेच्या पदाधिका-याचे म्हणणे बातमीत घ्यावे. अनेकवेळा कोणाला तरी बदनाम करण्यासाठी अशा बातम्या पुरविल्या जात असतात, याचे बातमीदाराला भान असले पाहिजे.

 

पावसाळ्यात पावसाची बातमी लिहिताना पाऊस मोजताना कोणते परिमाण वापरतात, तत्याच्या नोंदी कोठे कोठे केल्या जातात, याची माहिती बातमीदारास असली पाहिजे. अतिवृष्टी म्हणजे काय? धरणाचे पाणलोट क्षेत्र, लाभक्षेत्र म्हणजे काय? धरणातील साठा, धरणात येण्याऱ्या पाण्याचा वेग, धरणातून सोडले जाणारे पाणी मोजण्यासाठी तसेच भूकंप मोजण्यासाठी कोणती एकके वापरली जातात, हे सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून समजावून घेतले पाहिजे. बातमीदाराने हवामान, पर्जन्यमानाची आकडेवारी वेळच्या वेळी द्यावी.

 

मोठ्या नेत्यांच्या, तसेच साहित्यिकांच्या सभा-समारंभांना स्वतः उपस्थित राहूनच मग वार्तांकन करायला हवे. त्याचबरोबर वक्त्यांच्या बोलण्यामागे नक्की हेतू कोणता, हेही त्यांच्या देहबोलीतून, आवाजातील चढ- उतारावरून लक्षात येऊ शकते. अनेकवेळा ही मंडळी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर थेट मतप्रदर्शन न करता मिश्कीलपणे किंवा उपरोधिकपणे टिप्पणी करीत असतात.  त्यावेळी त्यांच्या चेह-यावरील हावभाव, हातवारे बरेच काही बोलून जात असतात. त्यावरून त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळणे सोपे जाते.

 

अनेकवेळा लोक आपल्याकडे विविध मागण्यांची पत्रके घेऊन येतात, त्यात त्यांनी त्यांच्या हितसंबंधाचीच कैफियत मांडलेली असते. मात्र अनेकवेळा ती मागणी किंवा तक्रारीच्या खोलात आपण गेलोत तर ती समाजातील मोठ्या गटाशी निगडीत असल्याचे निदर्शनास येते व ती बातमी तालुका, जिल्हा किंवा राज्यस्तरावरील होऊ शकते. त्यामुळे पत्रकातही बातमी दडलेली असते म्हटले जाते.

 

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकाच्या तोंडी सोशल मिडियाचीच चर्चा असते. या मिडियाचा फायदा आपण घेला पाहिजे मात्र, त्याच्यावरील माहितीची किंवा छायाचित्रांची खात्री करूनच ती उपयोगात आणावीत. छाराचित्रांमध्ये अनेकवेळा जोडतोड (मिक्सिंग) करणे तांत्रिक दृष्टीने सोपे झाले आहे, तेंव्हा मिळालेले छायाचित्र अस्सल आहे ना याची खात्री करून घ्यावी. आता सर्वच वर्तमानपत्र सोशल मिडियाचा वापर करत आहेत. आपणही त्यासाठी तयार असले पाहिजे.

 

जातीय हिंसाचार, दंगलींचे वार्तांकन करताना संयम राखणे गरजेचे आहे. या बातम्या अतिशय संतुलित असल्या पाहिजेत. आपल्या बातमीतून घटनेची माहितीच पोचली पाहिजे, आपल्या बातमीमुळे ती दंगल भडकेल अशी तिची शब्दरचना असता कामा नये. अशा बातम्या लिहिताना तारतम्य बाळगणे महत्वाचे असते.

 

बातमीत लिहिलेली नावे पूर्ण असावीत. अनेकवेळा श्री. पाटील, श्री. देशमुख, श्री. जोशी अशी अर्धवट नावे वापरली जातात. अधिकारी, पदाधिकारी यांची नावे लिहितानाही मागे पद व नंतर केवळ आडनाव असे लिहिलेले असते; हे टाळावे. एखाद्या व्यक्तीचे नाव माहिती नसेल तर केवळ त्याचे आडनाव लिहिण्याचा मोह टाळावा.

एकाच बातमीत एखाद्या व्यक्तीचे नाव सर्वत्र सारखेच येईल हेही पाहावे. विशेषतः निधन, गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये नावे चुकल्यास गडबड होण्याची शक्यता असते.

 

छोटी वाटणारी बातमीही मोठी होऊ शकते. एखादी घटना प्रथमतः अगदी छोटी वाटत असते. त्यामुळे आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र, नंतर तीच बातमी राज्यभर गाजते. त्यामुळे आपण कोणत्याही घटनेकडे दुर्लक्ष करू नये.

 

भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन उत्तम असावे, शब्दांची मर्यादा पाळली तर बातम्या प्रसिद्ध होण्याचे प्रमाण वाढते. प्रत्येक 10 वर्तमानपत्राची स्वतंत्र भाषाशैली असते. ती आपण आत्मसात केली पाहिजे. आपली बातमी पाठविण्यापूर्वी ती आपणच दोनवेळा वाचावी, एवढेच नव्हे तर छापून आलेली बातमीही वाचावी, म्हणजे नेमके काय संपादन (एडिटिंग) झाले ते लक्षात येईल व पुढीलवेळी आपल्या कॉपीत सुधारणा करता रेईल. एक छायाचित्र हजार शब्दांचे काम करत असते, असे म्हणतात. ते खरेच आहे. त्यामुळे छायाचित्रे पाठवताना किंवा काढताना ती बोलकी असली पाहिजेत. फोटोग्राफरकडे पाहणारे चेहरे असलेली छायाचित्रे पाठविणे टाळावे.

 

वैयक्तिक लिखाणातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्ररत्न करावा. त्यासाठी सखोल वाचन आवश्यक आहे. किमान एका तरी विषयात तज्ज्ञता मिळविण्याचा प्रयत्न करावा. बातमीदार हा सर्वज्ञ असतो असा वाचकाचा समज असतो.

त्यामुळे आपणास प्रत्येक विषयातील किमान माहिती असणे आवश्यक आहे.

 

बातमीदाराकडे त्या दैनिकाचाच नव्हे तर समाजाचा प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या प्रतिमेला धक्का बसेल असे कोणतेही वर्तन असू नये. आपल्या बातम्यांमध्ये समाजाचे प्रतिबिंब असेल, बातमीत सखोल व अभ्यासपूर्ण माहिती देण्यावर आपला भर असेल तर आपली विश्वासार्हता वाढते. वर्तमानपत्राचीही विश्वासार्हता त्याबरोबर वाढत असते. अनेकजण अधिकारी किंवा पुढा-यांचे प्रसिद्धीप्रमुख आहेत अशा पद्धतीने वागत असतात. त्यांना समाजात मान मिळत नाही. अधिकारी, पुढा-यांशी आपले संबंध आहेत म्हणून त्यांच्याविरोधात बातमी लिहिणे टाळू नये, ते चांगले असले तरी त्यांच्या अधिकाराखाली कार्यरत असलेल्या यंत्रणेतील दोषावर आपण लिहिले पाहिजेच कारण ते वाचकांच्या हितासाठी महत्वाचे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *