तंत्रज्ञान, कौशल्ये आणि विेश्वासार्हता!

संतोष देशपांडे संचालक मिडियाक्यूरा इन्फोलाइन, पुणे

(santosh@mediacura.com)

 

मराठी पत्रकारिता सध्या वेगळया संक्रमणावस्थेतून जात आहे. हे संक्रमण प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि नवा वाचकवर्ग यांच्या मिलाफातून घडते आहे. ग्रामीण पत्रकारितेचे केंद्रस्थान हा बातमीदार असायचा. आजही तो आहे, मात्र त्याची पत्रकारितेवरील मक्तेदारी पूर्वीसारखी राहिलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, समाजाला आता स्वतःला व्यक्त होण्यासाठीचे माध्यम मोबाईल व इंटरनेटच्या निमित्ताने लाभले आहे. अमूक वा तमूक बातमी प्रसिद्ध करण्यासाठी स्थानिक बातमीदारांवर विसंबून राहण्याची वृत्तीही कमी होत चाललेली आहे.

 

त्यात पुन्हा, इलेक्ट्रॉनिक विशेषतः टीव्ही माध्यमाचे असणारे आकर्षण प्रभाव आणि त्याची व्याप्ती यांमुळे वृत्तपत्रांच्या बातमीदारीला एका निराळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. आघाडीच्या वृत्तपत्रांनी जिल्हावार आवृत्या काढल्या तरी त्यांचा प्रभाव हा ठराविक जिल्ह्यांपुरता मर्रादित राहतो असा सूर आहे. मात्र, त्याच आवृत्या या ई- पेपरच्या माध्यमातून जगभरात वाचल्याही जातात, ही देखील तंत्रज्ञानाने दिलेली देणगी म्हणावी लागेल. म्हणून, ग्रामीण असो वा शहरी बातमीदारांचे महत्त्व कमी झालेले नसून, त्यांना अद्ययावत होण्याची संधी नव्या माध्यमसंस्कृतीने दिलेली आहे. या संधीचा लाभ जे घेतील, त्यांनाच भवितव्य असेल व जे यापासून दूर राहतील, त्यांना तक्रार करण्याचीही संधी मिळणार नाही, इतक्या वेगाने तंत्रज्ञान बदलते आहे.

 

खरं सांगायचं तर तंत्रज्ञान ही आपल्यापुढे आलेली सुविधा आहे. मात्र, तिचा योग्य तेव्हा आणि योग्य तोच वापर केला गेला तरच त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येऊ शकतो. समाजातील अन्य घटकांच्या तुलनेत पत्रकाराला काकणभर सरस ज्ञान आणि माहिती असावी, अशी एक स्वाभाविक अपेक्षा समाजामध्रे असते आणि ती योग्यच आहे. म्हणूनच, केवळ बातमी समजणे, ती व्यवस्थित लिहिणे आणि ती तितक्याच तत्परतेने पोहोचविणे इतकेच काम आता पुरेसे नाही. तंत्रज्ञानाप्रमाणेच, वाचकांच्या अपेक्षांनीही कात टाकलेली आहे.

 

बातम्या चकटन् समजणे याहीपेक्षा त्या बातम्यांचा अर्थ लावता येणे व तो व्यक्तही करता येणे हे अधिक महत्त्वाचे आहे. अमूक गोष्ट घडली, अशा ब्रेकिंग न्यूज आता टीव्हीप्रमाणेच, सोशल मिडियावरही येतात. मात्र, त्यांचे विश्‍लेषण करता येईल किमान इतकी माहिती आणि विषयातील किमान समज ज्याच्याकडे असेल त्यालाच नव्या समाजामध्ये खरा मान मिळेल. येत्या पाच-दहा वर्षांत विलक्षण आकलनशक्ती असणारा आणि तंत्रज्ञानाची समज असणारा वाचकवर्ग तयार होतो आहे. त्याला आपण पत्रकार म्हणून काय देऊ शकतो, याचे चिंतन केले तरी आपण सध्या कुठे आहोत, याची नेमकी जाणीव होऊ शकेल. तंत्रज्ञान बदलले, नवनवीन गॅझेटस् हाती आली तरी भाषेवरील प्रभुत्व, शब्दांचे नेमके अर्थ, कोणता शब्द कुठे वापरावा याची योग्य जाणीव, मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याचे संकेत, समाजातील विश्वासार्हता अशा कितीतरी बाबी या कायमच महत्त्वाच्या असणार आहेत.

 

इंटरनेटमुळे प्रिंट आणि ऑडिओ-व्हीडीओ अशा दोन्हींचा झालेला अनोखा मिलाफ, त्यातून तयार झालेला नवा वाचकवर्ग, नव्या पिढीची बदललेली भाषा आणि अभिव्यक्ती या सर्व बाबींचा विचार करता, वेब मिडिया अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे. मागील काही वर्षांत सोशल मिडियावरील विविध प्रवाहांतून आपण ते अनुभवतोच आहे. देशात राजकीय मतपरिवर्तनामध्ये प्रथमच सोशल मिडियाने मोठा हातभार लावला हे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनी दाखवून दिले आहे. टीव्ही अथवा वृत्तपत्रांनी बातम्या टाळूनही मध्यंतरी अनेक ठिकाणी सोशल मिडियावर फिरणाऱ्या खऱ्याखोट्या बातम्यांमुळे दंगली पेटलेल्या आपण अनुभवले आहे. ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. वाचकवर्ग आता पत्रकारांवर अवलंबून नाही, तो त्याचे स्वतःचे माध्यम तयार करु पाहतोय.

 

व्हॉटस्अप वरील विविध ग्रुप तेच दर्शवितात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी, नव्या वाचकांची नस जाणून घेता आली पाहिजे. तंत्रज्ञानामुळे बातम्या त्वरित प्रसारित करता येतील, पण विेश्वासार्हतेचा शिक्का हा फक्त आणि फक्त आपली कौशल्ये, अभ्यास, प्रामाणिकता आणि समाजातील व्यवहार यांतूनच मिळू शकतो. त्यासाठी कैक वर्षे जावी लागतात. अजून तरी विश्वासार्हता डाऊनलोड करता येत नाही. आपले मोबाईल-वाचन कमी करुन लेखन-कौशल्य वाढवणे, आपले लेखन-कौशल्य वाढविण्यासाठी पुस्तकांचे वाचन अधिकाधिक करणे, पुस्तकांचे वाचन केल्याने मनातील विचारांचा परिघ रुंदावतो. आपल्या गावात लहान मुले मोबाईल उत्तम वापरतात, याचे कौतुक स्वाभाविक आहे…पण आपण ज्यावर पोसलो गेलो, त्या वाचनसंस्कृतीचे माहेर असणाऱ्या ग्रंथालयाची अवस्था आज काय आहे, या प्रश्नाच्या उत्तरामध्येच इतर अनेक उत्तरे दडलेली आहेत. म्हणून, वर्तमानाला कवेत घेऊनच भविष्यवेधी राहावे लागेल, असे मला वेब मिडियात असतानाही आवर्जून नमूद करावेसे वाटते.

 

अखेरीस, एक सांगावेसे वाटते, ज्याप्रमाणे आपण कलाकार, खेळाडू, व्यावसायिक यांच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडतो, त्याचप्रमाणे, आपल्याविषयी अन्य कोणी (खराखुरा) लेखाजोखा मांडायला गेले, तर काय लिहिले जावे…..हे ठरवणे, आपल्याच हाती आहे. त्यातील शब्द न् शब्द आपण ठरवू शकतो. आपल्या कार्यातून!

(लेखक मुक्त पत्रकार असून नवमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *