मिलिंद बांदिवडेकर
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.
प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि शासकीय कार्यालये यांचा दररोजचा संबंध असतो. पण शासकीय कार्यालये आणि विविध योजनांबाबत वृत्तांकन करीत असताना काही पथ्ये आणि व्यावसायिक मूल्ये पाळणे गरजेचे आहे. याचे पालन करून केलेली पत्रकारिता शासन आणि जनता यांच्यातील संवादाचा सेतू बनते.
साध्या शब्दात म्हणायचं झालं तर वार्तेचं हरण करणारा तो वार्ताहर. काही वर्षांपूर्वी केवळ तालुका, जिल्हा स्तरावर कार्यरत असणाऱ्या वार्ताहरांच विेश, सध्या अगदी गाव पातळीपर्यंत विस्तारलं आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलं तर छापून आलेल्या सर्व मजकुरावर अगदी आजही जनतेचा विेशास कायम राहिला आहे. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे विविध वाहिन्यांद्वारे 24 तासाच्या बातम्यांच्या प्रसारण काळातही प्रिंट मिडीयाचं महत्व अबाधित राहिलं आहे. पूर्वी एकच वार्ताहर किंवा बातमीदार अनेक प्रकारच्या घटनांवर आधारित बातम्या लिहित असत. पण सध्या व्यापक बदल झाला आहे. वृत्तसंकलनात स्पेशलायझेशन आले आहे. क्रीडा, व्यापार, राजकारण, समाजकारण, शिक्षण वेगळे उपक्रम तसेच अनेक विषयानुसार वृत्तसंकलन व बातमीदारी होत आहे. याचबरोबर वृत्तपत्र सृष्टीचं उद्योग म्हणूनही स्वरूप बदलत आहे. यामुळे आर्थिक स्थैर्यता प्राप्त झाल्याने अनेक युवक युवती या सृष्टीकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया असो या सर्वांचा पारा विश्वासार्हता या शब्दावर अवलंबून असतो. खाजगी असो किंवा शासकीय असो यामध्ये अधिकृत, विेश्वासार्हता या दोन बाबी वृत्तसंकलनाचे दृष्टीकोनातून महत्वाच्या आहेत.
राज्य शासन, केंद्र सरकार किंवा अंगीकृत असलेली विविध महामंडळ यापासून शासनस्तरावरील शेवटचा घटक म्हणजे ग्रामसेवक व तलाठी. या शासकीय घडमोडींचं वृत्तांकन करताना शासकीय कारभाराचं ज्ञान, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बरोबरचा संपर्क, आदी बाबी वार्ताहराच्या बाजूने अत्यंत महत्वाच्या आहेत. शासन निर्णयांचा (जी.आर) अभ्यासाबरोबरच गाव पातळीपासून मंत्रालय पातळीपर्यंत शासनाची कार्यप्रणाली कशी सुरु असते याची बऱ्यापैकी जाण असणे महत्वाचे आहे. अधिकृतरीत्या कोणती माहिती कोणाकडून उपलब्ध होईल हे अनुभवातून अधिक स्पष्ट होत असलं तरी शासकीय वृत्तसंकलनासाठी वार्ताहराने यासाठी अभ्यासूवृत्ती जोपासून आपल्या वैयक्तिक ज्ञानात भर घालायला हवी.
रोजच्या दैनिकांमधून शासनाचे विविध विभाग असोत किंवा योजना असोत या संदर्भात चांगल्या तसेच तक्रारीबाबत बातम्या प्रसिद्ध होतात. या अनुषंगाने या बाबतीतील कोणतीही बातमी एकांगी होऊ नये. जनतेपर्यंत तक्रार व शासनाची बाजू या दोन्हींचा बातमीत समावेश करून वस्तुस्थिती निर्दशक माहिती देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. गावपातळी असो किंवा मोठी शहर, जिल्ह्याची किंवा तालुका मुख्यालय या प्रत्येक ठिकाणचा वैयक्तिक संपर्क किती मजबूत आहे यावर योग्य माहिती मिळण्याचा स्त्रोत अवलंबून असल्याने या फिल्डवर काम करणाऱ्या वार्ताहरांनी हा दृष्टीकोन ठेऊन आपला संपर्क विस्तारित करायला हवा.
सर्वसाधारणपणे गावपातळी सोडली तर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस प्रमुख असे वार्ताहरांचे तीन बीट कार्यरत असतात. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर शासकीय कार्यालयांसाठी एकच वार्ताहर कार्यरत असतो. तालुकास्तरावर कार्य करणाऱ्या वार्ताहरांचा तालुका स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचा-यांशी सुसंवाद हवा. कारण बातमीचा माहितीचा स्त्रोत म्हणून यांचेकडूनच अधिकृत माहिती मिळते. तालुक्याची भौगोलिक रचना, रस्ते विकास याचाही त्यांना परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. शासन निर्णय कसे होतात, विधानसभा, विधानपरिषद या दोन सभागृहात निर्णय प्रक्रिया कशी होते इथपासून जिल्हा पातळीवर शासन निर्णयांची अंमलबजावणी कशी होते याचं सखोल ज्ञान जिल्हा पातळीवर विविध बीट अनुसार वृतांकन करणाऱ्या वार्ताहरांना हवं. शासकीय वृत्तामध्ये महत्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचे वृत्तसंकलानासाठी संबंधित योजना, योजनेचा शासन निर्णय, अंमलबजावणी करणारा अधिकारी यांचे माध्यमातून मिळणारी माहिती व त्यावर आधारित वृत्त अशी कार्यप्रणाली राबवणे गरजेचं आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, रोहयोद्वारे वृक्ष लागवड, ऊस पाचट उपक्रम आदी अलीकडच्या काळातील योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वार्ताहरांनी अगदी गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत या योजनांची विविध माध्यमांद्वारे यशस्वीपणे मांडणी केली.
शासकीय काम अन् सहा महिने थांब, शासनाचा कारभार म्हणजे असाचं, अशा काही प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये दिसून येतात. या परिस्थितीत यामध्ये संबंधित वार्ताहराची भूमिका महत्वाची असते. या विभागाने विविध विषयांवर प्रस्तुत केलेली वृत्ते, लेख, यशकथा याची परिणामकारकता लक्षात घेऊन त्याचे संकलन करून ती प्रसिद्ध करण्याची कामगिरी वार्ताहरांना करावी लागते.
शासकीय विभागांनी आयोजित केलेले पत्रकार पाहणी दौऱ्यात शासनाची चांगली बाजू किंवा झालेला विकास दाखविण्याच्या संबंधित विभागाचा प्रयत्न असतो. यामध्ये काही आढळल तर वार्ताहरांनी वृत्तांकन करताना संबंधित अधिका-यांशी त्यावेळी चर्चा करून अधिकृत माहितीवर आधारित वृत्त करण्यावर भर द्यायला हवा. दैनिक, साप्ताहिक, दुरचित्रवाहिन्या यांच्या प्रतिनिधींनी तक्रारी स्वरूपाच वृत्तांकन करताना संबंधित शासकीय विभागाच्या अधिका-यांशी याबाबत सम्यक चर्चा व माहिती घेऊनच वृत्त प्रसृत होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे.
शासनामार्फत प्रसृत होणाऱ्या शासन निर्णयांची भाषा क्लिष्ट स्वरुपाची असेल तर शासन निर्णय जनसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत संबंधित वृत्त प्रसृत होईल असं पाहायला हवं. काही प्रसंगी शासन निर्णय ज्या शासकीय विभागाशी संबंधित आहे त्या विभागाच्या अधिका-यांशीही समक्ष संपर्क साधून व चर्चा करून त्यावर आधारित वृत्त प्रसृत करायला हवं.
शासकीय वृत्तसंकलानाबाबत पाळावयाची पथ्य या संदर्भात भरपूर उहा-पोह करता येईल. तथापि अधिकृत माहिती, नेमकेपणा, बिनचूक आकडेवारी, अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाशी सौहार्दपूर्ण संपर्क, या बाबी अंगी बाणविल्यास शासकीय वृत्त अधिक मुद्देसूद, माहितीपूर्ण, वाचनीय होऊ शकते.