नवे माध्यमप्रवाह आणि आपण

परेश प्रभू

संपादक, दै. नवप्रभा, गोवा

 

देशातील जवळजवळ 280 दशलक्ष साक्षर वर्तमानपत्रे वाचत नाहीत. आज देशातील 53 टक्के वाचक हा ग्रामीण वाचक आहे. या वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक बाजारपेठेमध्ये असलेल्या संधी आता वृत्तपत्रचालकांच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत, त्यामुळेच मोठमोठे वृत्तपत्रसमूह आज छोट्या छोट्या ग्राहकक्षेत्रामध्ये पाय रोवण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्रे ताब्यात घेऊन आपल्या प्रचंड नेटवर्कचा लाभ त्यांना मिळवून देऊन आक्रमक मार्केटिंगद्वारे आणि खपवाढीच्या नवनव्या क्लृप्त्या वापरून त्या बाजारपेठा काबीज करण्यामागे लागल्या आहेत. देशातील आघाडीच्या वृत्तपत्रसमूहांनी देशी भाषांतील अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रे ताब्यात घेऊन आपल्या समूहाच्या पंखांखाली आणलेली आपल्याला दिसतील. त्यांना त्यांनी आधुनिक रूप दिले आहे. आकर्षकता आणली आहे.

 

इंटरनेटचा वाढता प्रसार

एकीकडे प्रादेशिक माध्यमांमध्ये आशादायक चित्र दिसत असताना दुसरीकडे भारतातील वाढत्या इंटरनेट पेनिट्रीशनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इंटरनेटचा विस्तार वाढत चालला आहे. ब्रॉडबँड इंटरनेट सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. मोबाईल स्मार्टफोन आणि टॅब्लेटची मागणी प्रचंड वाढलेली आहे. संगणकांपेक्षाही टॅब्लेटला असलेली वाढती मागणी या स्थित्यंतराचा प्रत्यय देते. गार्टनर’ या मार्केट रीसर्च संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर यंदा संगणकाचा खप 8 टक्क्यांनी घटला, तर टॅब्लेटची विक्री मात्र 70 टक्क्यांनी वाढली आहे. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटची खरी मजा चाखायची असेल तर त्यावर इंटरनेट जोडणी ही आवश्यक असते. त्यामुळे अशा इंटरनेटयुक्त उपकरणांच्या वाढत्या संख्येचा आणि त्यावरील
अॅप्सद्वारे आपली इतर कामे करता करता रोजच्या बातम्या बघण्याच्या वाढत्या सवयीचा परिणाम हळूहळू आपल्या पारंपरिक माध्यमांवर होणारच आहे. पाश्चात्य जगतामध्ये आज जे घडते आहे, ते लोण आपल्यापर्यंत यायला कदाचित आणखी काही वर्षे लागतील, परंतु कन्व्हर्जन्स हा या बदलत्या युगाचा परवलीचा शब्द आहे हे विसरून चालणार नाही.

 

भारतामध्ये आज 13 कोटी 70 लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी आहे. सन 2017 पर्यंत देशात 386 दशलक्ष घरांपर्यंत म्हणजे 38 कोटी घरांमध्ये इंटरनेट पोहोचलेले असेल. इंटरनेटयुक्त स्मार्टफोन्सची देशातील संख्या सन 2012 मध्ये 38 दशलक्ष होती, ती सन 2017 मध्ये 241 दशलक्षांवर जाईल असा अंदाज आहे. ही संख्या त्याहून मोठी असू शकते.

 

फेसबुकिस्तान, ट्वीटरीस्तान!

फेसबुकची ताकद काय असू शकते हे अलीकडेच काही देशांमध्रे झालेल्या उठावांतून पुरेपूर दिसून आले आहे. फेसबुकद्वारे राज्यक्रांती जशी घडू शकते, तशीच बंगलुरूमध्ये ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांची फेसबुकवरील अफवांमुळे जी पळापळ झाली तसे प्रकारही होऊ शकतात.

 

ट्वीटरवर जगातील पाचशे दशलक्ष म्हणजे पन्नास कोटी लोक आहेत. जून 2012 ते मार्च 2013 या काळात ट्वीटर वापरणा-यांच्या संख्येत 44 टक्के वाढ दिसून आली आहे. जगातील नेटिझन्सपैकी 21 टक्के लोक ट्वीटर वापरतात. यूट्यूबवर पाचशे दशलक्ष यूजर्स आहेत. दर सेकंदाला त्यावर जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून सरासरी एका तासाचे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि दरमहा सहा अब्ज तास व्हिडिओ पाहिले जातात. गुगल प्लसशी रोज 9 लाख 25 हजार नवे यूजर्स जोडले जात आहेत. लिंक्ड इन वर 200 देशांतील 26 लाख कंपन्यांची खाती आहेत. हा सगळा तपशील या नव्या युगाच्या नव्या संवाद माध्यमाचा विस्तार आणि नव्या पिढीवरील प्रभाव स्पष्ट करण्यास पुरेसा असावा. सोशल मीडियामध्ये वायफळ गोष्टींवर प्रचंड कालापव्यय केला जातो आणि या माध्यमाची खरी ताकद वापरलीच जात नाही हे जरी खरे असले, तरी जनमत घडवण्यात हे माध्यम मुद्रित वा टीव्हीसारख्या माध्यमाच्या तोडीस तोड योगदान देऊ शकेल हे लक्षात ठेवावे लागेल. म्हणूनच तर भारत सरकारने माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत या नव्या माध्यमांद्वारे आपल्या प्रचार मोहिमा राबवण्यासाठी एक विभाग स्थापन केला आहे.

 

 

वाचकाशी दुहेरी संवाद

झपाट्याने उदयास आलेल्या सोशल मीडियामध्ये चाललेला संवाद एकतर्फी नाही. तो दुहेरी संवाद आहे. त्यामुळे आपल्या वाचकाला एकतर्फी मजकूर न देता त्याच्या आवडीनिवडी, त्याची प्राधान्ये समजून घेऊन आणि त्याच्या म्हणण्याला महत्त्व देऊनच माध्यमांना पुढे जावे लागणार आहे. वाचकांचा प्रतिसाद आजमावून त्याच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे ही वाचक टिकवण्याच्या दृष्टीने आजची मोठी गरज आहे. शेवटी वृत्तपत्र हे वर्तमानाशी संबंधित असते. वर्तमानासोबतच त्यांना राहावे लागेल. वाचकाला गृहित धरण्याचे दिवस कधीच संपले आहेत. आजचा वाचक हा ‘वेल इन्फॉर्म्ड’ आहे. त्याला माहिती आणि ज्ञानाचे इतर अनेक पर्याय आज सहज उपलब्ध आहेत.

 

अनेक स्त्रोतांतून त्याच्याकडे अद्ययावत माहिती पोहोचत असते. वाचकानुनय करण्याच्या नादात वृत्तपत्रांचे गांभीर्य हरवत जाण्याची भीतीही निर्माण झालेली आहे. खप आणि दर्जा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे लोकप्रिय’ असते ते अभिजात’ असतेच असे नाही. पण जाहिरातींद्वारे खोऱ्याने पैसा कमावण्यासाठी काहीही करून खपाचे आकडे वाढवण्याची आज बहुतेक व्यवस्थापने धडपडताना दिसतात.

 

आपल्या भोवतीचा समाज बदलला, तत्याच्या आवडीनिवडी बदलल्या, धारणा बदलल्या, मूल्ये बदलली, अभिरुची बदलली, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वातावरण बदलले. या सगळ्याचे प्रतिबिंब आजच्या प्रसारमाध्यमांतून उमटताना दिसते आहे. आजवर अनेक आव्हानांचा सामना करीत प्रसारमाध्यमांनी येथवर मजल मारली. भविष्याचा विचार करता येणारी आव्हाने अधिक कठीण असतील हे तर दिसतेच आहे. काळ कोणासाठी थांबत नसतो आणि प्रसारमाध्यमांची नाळ तर वर्तमानाशी जुळलेली आहे. त्यामुळे बदलत्या काळासरशी या क्षेत्रातही बदल अपरिहार्य आहेत.

 

पण या साऱ्या खटाटोपाच्या मुळाशी आहे तो सामान्य माणूस. या देशातील अडलेल्या नडलेल्या, खचलेल्या पिचलेल्या सर्वसामान्य माणसाला आधार आहे तो प्रसारमाध्यमांचा. त्याच्याकडे तो विेशासाने आणि आशेने पाहतो आहे. आपला आवाज बुलंद करणारे कोणीतरी आहे हा त्याचा विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आणि आजच्या व्यावसायिक कालखंडातही पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पत्रकारितेच्या उर्जस्वल परंपरेला तिलांजली द्यायची नाही एवढे भान जरी प्रसारमाध्यमांमध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाने ठेवले तरी पुरेसे आहे. काळ बदलेल. वाचक बदलेल. तंत्रज्ञान बदलेल. माध्यमही बदलतील. बदलणार नाहीत ती पत्रकारितेची मूलतत्त्वे! त्यांच्याशी बांधीलकी राखणे हेच आजचे सर्वांत मोठे आव्हान आहे. सुदैवाने ही बांधीलकी असलेले पत्रकार आजही मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणूनच पत्रकारितेची प्रतिष्ठा टिकून आहे. आपला आब राखून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *